टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली खिल्ली


इस्लामाबाद – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या सर्वस्तरातून भारतीय संघावर टीका होत आहे. भारतीय फलंदाजांच्या दुसऱ्या डावातील खराब कामगिरीमुळे चाहते नाराज झाले असून टीम इंडियाला अनेक माजी खेळाडूंनीही खडे बोल सुनावले आहेत. त्यातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने देखील संधी साधत टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.


मी झोपेतून जागा झालो तर ३६९ असा आकडा मला दिसला. पण नंतर नीट पाहिले तेव्हा ३६/९ अशी परिस्थिती होती. यावर मलाही विश्वास बसला नाही आणि मी झोपून गेलो, अशा शब्दांमध्ये शोएबने भारतीय संघावर टीका केली आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्येचा पाकिस्तानचा विक्रमही भारताने मोडल्याचे म्हणत शोएबने विराटसेनेचे कौतुक केले आहे.

कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व येईल. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर जाणे, यामुळे अंतिम ११ जणांचा संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच असणार आहे.