कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पक्षासाठी काम करण्यास तयार: राहुल गांधी


नवी दिल्ली: पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या इच्छेनुसार काँग्रेस पक्षासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याची ग्वाही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.

पक्षाची पडझड रोखण्यासाठी संघटनेमध्ये आमूलाग्र बदल आणि पूर्णवेळ नेतृत्वाची मागणी करणाऱ्या असंतुष्ट नेत्यांशी सोनिया यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांनी चर्चा केली. यावेळी राहुल यांनी बूथ पातळीपासून पक्ष बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

या बैठकीत असंतुष्ट नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी कायम ठेवली. पी चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या मागणीला पाठींबा व्यक्त केला. त्याचप्रमाणे दिल्लीतून सरचिटणिसांनी राज्यातील कारभार चालविण्यापेक्षा राज्याच्या पक्षाध्यक्षांना अधिक अधिकार देणे आणि बूथ समित्यांचे बळकटीकरण करणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

पक्षात सुसंवाद प्रस्थापित करणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणे या मुद्द्यांवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भर दिला. संघटनेची पुनर्रचना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांच्यावर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली नाही. नाराज नेत्यांनीही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.