‘महिलांना मिशा उगवल्या तर…’ ब्राझीलच्या अध्यक्षांकडून ‘फायझरची खिल्ली


ब्रासिलिया: संपूर्ण जगात कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा केली जात असताना ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी फायझरच्या लसीची खिल्ली उडविली आहे. यही लास घेतल्यानंतर महिलांना मिशा उगवल्या तरी त्याची जबाबदारी घेण्याची ‘फायझर’ची तयारी नाही, असे ते म्हणाले.

बोलसोनारो यांनी, ‘कोविड १९ हा सामान्य ताप असल्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. कोरोनावरील लसीवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. फायझरची लस घेतल्यानंतर दुष्परिणाम (Side Effect) झाल्यास त्याची जबाबदारी उत्पादकांवर नसल्याचे त्यांच्या करारात नमूद करण्यात आले आहे, याकडे ते लक्ष वेधतात. ब्राझीलमध्ये कोरोनाची लस घेणे ऐच्छिक असून त्यांच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जात असतानाच बोल सोनारो यांचे फायझरची खिल्ली उडविणारे विधान प्रसिद्ध झाले आहे. लस घेतल्यानंतर तुमचे रूपांतर मगरीत झाले तरी त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल. लस घेऊन तुमच्यामध्ये अतींद्रिय शक्ती निर्माण झाली. बायकांना मिशा उगवल्या, पुरुष बायकी आवाजात बोलू लागले… असे काहीही घडले तरी ‘फायझर’ला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. सर्वस्वी जबाबदारी तुमचीच असेल, असे बोलसोनरो यांनी म्हटले आहे.