हिंद महासागरातील भारतीय वर्चस्वाची चीनला चिंता


बीजिंग: चीनमधील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाने हिंद महासागरावर भारताचे वर्चस्व मान्य केले असून या परिसरातील भूराजकीय परिस्थिती भारताला अनुकूल असल्याचे या पक्षाने मान्य केले आहे. इंडो पॅसिफिक विभागातील देशांशी भारताच्या वाढत्या संबंधांची चिंता चीनला अधिक वाटत आहे.

सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’बाबत प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, भारताच्या पुढाकाराने या प्रभागात सुरु करण्यात आलेल्या अनेक उपक्रमांमध्ये बहुतेक देश सहभागी झाल्याने भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

‘इंडो-पॅसिफिक’ धोरणामुळे भारताने हिंद आणि प्रशांत महासागराला जोडले आहे. पूर्वेकडील आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंतच्या देशांशी भारताने सौहार्द प्रस्थापित केले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘इंडो-पॅसिफिक’ देशांचे सहकार्य हा उद्याचा अंदाज नाही तर कालचे वास्तव आहे.

चीन इंस्टीट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी लिहिलेल्या या लेखात हिंद महासागराच्या क्षेत्रातील अनेक देशांशी भारताने छोट्या छोट्या उपक्रमांद्वारे सहकार्य प्रस्थापित केल्याचे नमूद केले आहे.

मागील काही काळापासून मानवतावादी सहकार्य आणि आपत्कालीन मदत याद्वारे भारताने हिंद महासागर क्षेत्रातील आपली भूमिका आणि प्रभाव याचा विस्तार केला आहे. या क्षेत्रातील मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स.या ५ देशांना भारताने कोरोना महासाथीच्या काळात अन्न आणि वैद्यकीय मदत पुरविली आहे. सन २०१९ च्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडो-पॅसिफिक महासागर’ उपक्रम (आयपीओआय) प्रस्तावित केला होता, त्यानुसार ऑस्ट्रेलिया, जपान आणि आसियान गट यासारख्या देशांनी महासागरातील मालवाहतुकीच्या सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर भारताबरोबर काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

भारताला हिंद महासागरात सुरक्षा प्रदाता व्हायचे आहे, असे या लेखात उपहासाने नमूद केले असले तरीही हिंद महासागरातील भारतीय नौदलाच्या प्रभावाची ती चीनने दिलेली कबुलीच मनाली पाहिजे. या क्षेत्रातील अनेक देश भारताकडे विश्वासार्ह सुरक्षा सहकारी म्हणून आशेने पाहत आहेत.

हिंद महासागरातील जहाजांच्या वर्दळीवर नजर ठेवणारे गुरुग्राम येथील माहिती केंद्र हे या क्षेत्रातील विश्वासार्ह माहिती केंद्र म्हणून ओळखले जात आहे. या केंद्रात अमेरिका आणि फ्रान्सने आपले संपर्क अधिकारी यापूर्वीच रवाना केले आहेत. भारताने संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत व्हिएतनाम ते दक्षिण आफ्रिका तसेच श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार अशा ११ देशांमध्ये प्रशिक्षकांची पथके पाठविली आहेत. भारताच्या या प्रभावामुळे चीन अस्वस्थ आहे.