यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल- निर्मला सीतारामन

फोटो साभार मनी कंट्रोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सीआयआयच्या व्हर्च्युअल परिषदेत बोलताना करोना काळातील यंदाचा आगामी अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल असे सांगितले. हा अर्थ संकल्प तयार करताना नागरिक, उद्योजक, अर्थतज्ञ यांची मते, सल्ले आणि सूचना आवश्यक आहेत आणि त्या केल्या जाव्यात असे आवाहन केले.

सीतारामन म्हणाल्या करोना मुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी विकास गतीवर लक्ष्य द्यायला लागणार आहे. आरोग्य, चिकित्सा आणि विकास यात गुंतवणूक आवश्यक आहे तसेच टेली मेडिसिन मध्ये व्यापक कौशल्य विकास महत्वपूर्ण ठरणार आहे. रोजगार, उपजीविका संबंधी आव्हाने आहेत आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

अश्या अनेक बाबींमुळे गेल्या १०० वर्षात झाला नसेल असा यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व असेल. करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना, उद्योगांना, अन्य क्षेत्रांना आलेल्या अडचणी, त्या दूर करण्यासाठीचे उपाय आणि सूचना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

२०२१-२२ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. त्यात करोनामुळे जी क्षेत्रे प्रभावित झाली त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी समर्थन आणि विकास सहाय्य देण्यावर भर असेल. सीतारामन म्हणाल्या केवळ आपल्या देशाचा विचार न करता वैश्विक आर्थिक पुनरुत्थानात आपले महत्वाचे योगदान हवे. त्या दृष्टीने उद्योग जगताकडून सल्ला अपेक्षित आहे.