कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्राचे मोदींकडून कौतुक


नवी दिल्ली: कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या ८ पानी पत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. विनम्रपणे संवादाचा मार्ग तोमर यांनी या पत्राद्वारे अंगिकारला आहे. शेतकऱ्यांनी हे पात्र जरूर वाचावे. अन्य देशवासियांनीही ते वाचून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उद्योग व व्यापारमंत्री पियुष गोयल, तोमर आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या महत्वपूर्ण बैठकीनंतर तोमर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेले खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी नव्या कृषिकायद्यांचे समर्थन केले आहे. काही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणारे किमान हमी भावाचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, ही शुद्ध थाप आहे, असे आरोपही त्यांनी या पत्रात केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा यांनीही तोमर यांचे पत्र रिट्विट केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम फक्त मोदीच करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना ६० वर्ष लुबाडण्याचे काम ज्या लोकांनी केले तेच आता नव्या कृषिकायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, हा आरोपही त्यांनी केला.