व्हिडीओ व्हायरल; मोदींचा मास्क घेण्यास नकार


नवी दिल्ली – जगासह देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसून वारंवार कोरोना नियमावलीचे पालन करण्यास आरोग्य मंत्रालय सांगत आहे. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वारंवार आवाहन करत असतात. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हिडीओत मास्क घेण्यास सपशेल नकार देताना दिसत आहेत.


हा व्हिडीओ आम आदमी पक्षाने शेअर केला असून यावरुन नरेंद्र मोदींना ट्रोल केले आहे. नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात दिसून येत असून तिथे यावेळी स्टॉल लावलेली एक व्यक्ती त्यांना मास्क घेण्याचा आग्रह करताना दिसत आहे. गुजराती भाषेत समोरील व्यक्ती बोलताना ऐकू येत आहे. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना आम आदमी पक्षाने मोदींसारखं वागू नका, मास्क घाला, अशी उपहासात्मक टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या मागे असणारे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांनी व्हिडीओत मास्क घातलेला दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा उल्लेख आम आदमी पक्षाने व्हिडीओत केलेला नाही.