शीख संत राम सिंग यांची शेतकरी आंदोलनात आत्महत्या


नवी दिल्ली: शीख संत राम सिंग यांनी स्वतः;वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. शेतकऱ्यांची अवस्था बघवत नसल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवले आहे.

सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी असलेले ६५ वर्षीय राम सिंग हे हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी होते. आंदोलकांना पांघराण्यासाठी ब्लँकेट्स वितरित करण्यासाठी आंदोलनस्थळी आलेल्या रॅम सिंग यांनी आपल्या कारमध्ये बसून आपल्याकडील पिस्तुलातून स्वतःवर गोळ्या झाडल्या. राम सिंह यांना या घटनेनंतर कर्नाल रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शेतकऱ्यांची दुरावस्था होत असून त्याबद्दल विविध मार्गांनी असंतोष व्यक्त होत आहे. अनेक जणांनी याबद्दल आपले पुरस्कार परत केले आहेत. मात्र, सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण आपले प्राण अर्पण करीत आहोत, असे राम सिंग यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवले आहे.

संत राम सिंग यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. केंद्र सरकारने आणखी बळी न घेता शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन तिन्ही कृषी कायदे त्वरित रद्द करावे, अशी मागणी अकाली दलाने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही संत राम सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.