राहुल गांधी यांचा सभात्याग; वेळ वाया घालविल्याचा आरोप


नवी दिल्ली: राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीतून सभात्याग केला. सैन्यदलाला आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्याबाबत चर्चा करण्याऐवजी संसदीय समिती सशस्त्र दलाच्या गणवेशाबाबत चर्चा करण्यात वेळ वाया घालवित आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

या बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते. या बैठकीत सशस्त्र दलाच्या गणवेशाबाबत चर्चा झाली. भाजपच्या एका खासदाराने संभ्रम टाळण्यासाठी सैन्यदल, नौदल, हवाई दलातील जवानांसाठी सारखाच गणवेश असावा, अशी सूचना केली. मात्र, गांधी यांनी या प्रस्तावाला विरोध केला. संरक्षण दलांचा प्रत्येक विभाग आणि त्यांचा गणवेश याला गौरवशाली इतिहास असल्याचे मत गांधी यांनी व्यक्त केले.

वायनाडच्या खासदारांनाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीविषयी संसदीय समितीने चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र, समितीचे अध्यक्ष खासदार जुअल ओराम यांनी ती नाकारली. राष्ट्रीय सुरक्षा आणि लडाखमध्ये चीनच्या सैन्याशी दोन हात करणाऱ्या सैनिकांना अधिक सक्षम करण्यावर करावी, अशी मागणी गांधी यांनी केली. मात्र, त्यांना याबाबत बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले गांधी आणि राजीव सातव आणि रेवंत रेड्डी या काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.