राहुल गांधी यांचा पक्षाचे नेतृत्व करण्यास नकार


नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेण्यास माजी अध्यक्ष राहुल गांधीं यांनी नकार दिला आहे. पक्षात नेतृत्त्वाची पोकळी असताना नवा पक्षप्रमुख निवडण्याची तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.

पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधीं यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी यापूर्वी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून अद्यापही त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले.

सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या राहुल गांधी यांनी सन २०१७ मध्ये गांधी घराण्यापेक्षा बाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व करावे ही भूमिका घेऊन त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहेत, असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी यांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी ३ महिन्याहून अधिक काळ प्रयत्न केले. मात्र, राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पक्षाला कायमस्वरूपी आणि सक्षम नेतृत्व मिळावे अशी मागणी पक्षाच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी सोनिया यांच्याकडे तक्रार केली आहे. अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश आल्याने पक्षनेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सोनिया गांधी यांना प्रकृती साथ देत नाही आणि राहुल गांधी हे पक्षाचे नेतृत्व न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात आहे. नेतृत्व ठरविण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीची तारीख ठरविण्यासाठी पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक लवकरच अपेक्षित आहे.