धनंजय मुंडे व बच्चू कडू यांच्या हस्ते ब्रेल लिपीतील भारतीय संविधानाचे प्रकाशन


मुंबई : भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर करुन ते अंध बांधवांना उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे काम झाले आहे. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांगांसाठी अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करताना विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे केले.

ठाणे येथील अस्तित्व फाऊंडेशन या दिव्यांग निराधार यांच्या कल्याणार्थ काम करणाऱ्या अशासकीय संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी ब्रेल संविधान तयार केले असून त्याच्या मंत्रालय येथे बुधवारी आयोजित प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू तर भिवंडीचे आमदार रईस शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न बाकी आहेत. पूर्वी चळवळीच्या माध्यमातून बच्चूभाऊ व आम्ही आंदोलने केली. आता मंत्री म्हणून विभागाच्यामार्फत या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावायचे आहे. त्यानुसार काम सुरु आहे. नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या महाशरद पोर्टलचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. या महाशरद पोर्टलवर दिव्यांग बांधवांना माणूस म्हणून समाजात जगण्यासाठी सर्व साधने असून ती देणाऱ्या दानशूर व्यक्तींची नावेही त्यात आहेत.

वर्षभरात दिव्यांगांसाठी 32 निर्णय – राज्यमंत्री बच्चू कडू
अंध बांधव ब्रेल लिपीतील संविधान आता स्पर्शाने वाचू शकतील, ही मोठी ताकद आहे. त्याबद्दल ब्रेल लिपीतील संविधान तयार केलेल्यांचे आभार व अभिनंदन, या शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्व फाऊंडेशनचे ब्रेल लिपीतील संविधान निर्मितीबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून मी दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी लढत आहे. तो लढा अजूनही सुरु आहे. गेल्या वर्षभरात आम्ही दिव्यांगांसाठी 32 शासन निर्णय निर्गमीत केले. त्याचा मोठा लाभ होईल.

अनेक क्षेत्रात असे लक्षात आले आहे की, आपल्यापेक्षा अधिक काम हे दिव्यांग बांधव करतात. क्रीडा सारख्या क्षेत्रातही ते पुढे आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र बजेट पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. शासन दिव्यांगांसाठी सर्वतोपरी कार्य करीत आहे, समाजानेही दिव्यांगांच्या गरजा ओळखून शक्य ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाच्याबाबत त्यांनी आयोजकाचे विशेष आभार मानले.

आमदार रईस शेख यांनीही चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानून दिव्यांगांसाठी स्पेशल बजेट व राखीव जागा असाव्यात याचा ऊहापोह केला. प्रकाशनानंतर एका अंध मुलाकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर पवार यांनी केले.