अन्यथा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बंद होऊ शकते तुमचे व्हॉट्सअॅप


मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांच्याच गळ्यातील ताईत असलेल्या मागील अनेक वर्षांपासून व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक बदल झाले, अपडेटही आले. या अॅपचा वापर एवढा सर्रास झाला, की अनेकांसाठी महत्वाच्या कामांमध्येसुद्धा संदेश देवाण-घेवाणीसाठी व्हॉट्सअॅपलाच प्राधान्य देण्यात येत आहे. पण, ही परिस्थिती आता मात्र काहीशी बदलणार आहे. कारण, 2021च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2021 काही अॅन्ड्रॉईड कार्यप्रणाली आणि आयफोन डिव्हाईसवर हे अॅप काम करणार नाही.

व्हॉट्सअॅप iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टम नसणाऱ्या फोनमध्ये चालणार नाही. यासंदर्भातील यादीही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपकडून युजर्सना ऑपरेटींग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. असे केले तरच मेसेजिंग अॅपमधील काही नवे फिचर्स त्यांना वापरता येणार आहेत.

परिणामी तुम्हीही पुढील दिवसांमध्येही व्हॉट्सअॅपचा वापर सुरु करण्यासाठी फोनच्या ऑपरेटींग सिस्टीमबाबतची माहिती घ्या. पण असे न केल्यास तुम्हाला नव्या वर्षातच व्हॉट्सअॅपपासून दूर राहावे लागणार आहे. फोन अपडेट करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन सिस्टीम अपडेटच्या पर्यायाची निवड केल्यास ऑपरेटींग सिस्टीमचे नवं व्हर्जन अपडेट होऊन तुम्ही अॅपची सेवा अविरतपणे वापरु शकता.

दरम्यान, अ‍ॅपल कंपनीच्या iPhone 4, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6S ला व्हॉट्सअॅपच्या या नव्या व्हर्जनसाठी ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 च्या व्हर्जनने अपडेट करावे लागणार आहे. तर फर्स्ट जनरेशनचे iPhone 6S, 6 Plus, iPhone SE हे आयफोन असल्यामुळे iOS 14 वरून ते अपडेट करता येऊ शकतात. अँड्रॉईड फोनच्या बाबत सांगायचे झाले तर, 4.0.3 सिस्टीम नसणाऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. अशा फोनमध्ये HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, Samsung Galaxy S2 चा समावेश आहे.