बजरंग दलावर निर्बंधांची आवश्यकता नाही: फेसबुकचा खुलासा


नवी दिल्ली: बजरंग दलाकडून फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मजकुरात आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. त्यामुळे बजरंग दलाला फेसबुकच्या माध्यमाचा वापर करण्यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता नाही,असा खुलासा फेसबुकचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी संसदीय समितीसमोर केला आहे.

वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षेसंदर्भात माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने मोहन यांना पाचारण केले होते. त्यावेळी काँग्रेसचे खासदार कार्ती ‘ चिदंबरम यांनी ‘वॊल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्ताच्या आधारे फेसबुक आपला व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा यासाठी बजरंग डाळ या उजव्या विचारसरणीच्या आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्षाशी संबंधित संघटनेला झुकते माप देत आहे काय अशी विचारणा केली. त्याला मोहन यांनी नकार दिला.

बजरंग दलाच्या फेसबुकवरील मजकुरात फेसबुकच्या वस्तुस्थिती तपासणाऱ्या यंत्रणेला काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, असे मोहन यांनी स्पष्ट केले. दिल्ली नजीकच्या एका चर्चवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बजरंग दलाने घेतल्याचे फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आल्याचा संदर्भ घेऊन ‘वॊल स्ट्रीट जर्नल’ने फेसबुक बजरंग दलाला झुकते माप देत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.