दूरसंचार उपकरणांच्या चिनी कंपन्यांना भारताचा झटका


नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने दूरसंचार क्षेत्रासाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा निर्देश लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची विश्वासार्ह आणि अविश्वसनीय अशा श्रेणीत वर्गीकरण केले जाणार आहे. केंद्राच्या निर्णयामुळे हुवेई, झेडटीई आणि अन्य चिनी कंपन्यांना भारतीय दूरसंचार कंपन्यांसाठी उपकरणे पुरविणे अवघड होणार आहे. हुवेई आणि झेडटीई कंपन्यांनी मेरिकेसह अनेक देशांमध्ये ‘बॅकडोर’ किंवा ‘ट्रॅप डोअर’ यंत्रणेचा वापर करून चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. हुवावे आणि झेडटीईद्वारे उत्पादित उपकरणांच्या वापरावर अनेक देशांनी यापूर्वीच बंदी घातली आहे.

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना विश्वासार्ह उत्पादनांचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. उपकरणांची विश्वासार्हता ठरविण्याचे कार्य राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक करतील. त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अध्यक्षतेखालील समिती प्राधिकरणाची करेल, अशी माहिती दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. प्रसाद म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा उपासल्लागार दूरसंचार विषयी राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष असतील. या समितीत इतर विभाग व मंत्रालयांचे सदस्य असतील. तसेच स्वतंत्र तज्ञ आणि दूरसंचार उद्योगातील दोन सदस्यही समितीमध्ये असतील.