भारत हा आमचा सच्चा मित्र: शेख हसीना


नवी दिल्ली: भारत हा आमचा सच्चा मित्र आहे. सन १९७१ च्या युद्धात भारताने आम्हाला मोलाची मदत केली आहे, असे उद्गार बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काढले.

सन १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून बांग्लादेशची निर्मिती केली. त्या विजयाचा ५० वा वर्धापनदिन साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांशी हविदिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

या युद्धात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो. भारतीय सैन्यदलातील ज्या वीरांना या युद्धात हौतात्म्य पत्करावे लागले त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. बांग्लादेशच्या निर्मितीसाठी खुल्या मनाने मदत करणारे भारत सरकार आणि सर्वच भारतीय यांचे आपण आभारी आहोत, असे हसीना म्हणाल्या.

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणाचा बांग्लादेश हा प्रमुख स्तंभ असल्याचे मोदी यांनी नमूद केले. मुक्ती वाहिनी योद्ध्यांच्या पाकिस्तानवरील विजयाचा वर्धापनदिन आपल्यासह साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. हसीना यांनी आगामी वर्षात मोदी यांना बांग्लादेशात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी तिथे येणे आपल्याला निश्चितच आवडेल, असेही ते म्हणाले.

यावेळी भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये सहकार्याचे ७ करारही झाले. भारत आणि बांग्लादेशमध्ये सन १९६५ पर्यंत सुरू असलेली रेल सेवा पुन्हा सुरू करण्याचेही निश्चित करण्यात आले.