भाजप नेत्याचा गौप्यस्फोट; कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींना बजावली मोलाची भूमिका


इंदौर – मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार झालेल्या राजकीय नाट्यानंतर अल्पमतात येऊन कोसळले होते. त्यावेळी सरकार भाजपने पाडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मध्य प्रदेशात मावळत्या वर्षात झालेल्या या राजकीय भूकंपाबद्दल भाजपच्या नेत्यानेच मोठा गौप्यस्फोट केला आहे. नरेंद्र मोदी यांचीच कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना भाजपने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडल्याचा गौप्यस्फोट केला. विजयवर्गीय म्हणाले, कमलनाथ यांचे सरकार जोपर्यंत होते, तोपर्यंत सुखाने झोपू दिलं नाही. कमलनाथ यांना भाजपचा कुठला कार्यकर्ता असेल, जो स्वप्नातही दिसत असेल तर ते नरोत्तम मिश्रा होते. मिश्रा यांचे टाळ्या वाजवून स्वागत करायला हवे. पडद्यामागील गोष्ट मी येथे सांगत आहे, याची वाच्यता कुठे करू नका. आजपर्यंत कुणालाही मी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली नाही. या व्यासपीठावरून पहिल्यांदाच सांगत आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वाची भूमिका होती, तर ती नरेंद्र मोदी यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण, ही गोष्ट कुणाला सांगू नका. आजपर्यंत मी देखील कुणाला सांगितली नसल्याचे म्हणत विजयवर्गीय यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

मध्य प्रदेशातील राजकीय वर्तुळात कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडवून दिली. विजयवर्गीय यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस भूमिका मांडताना आमचे खरे ठरल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले, शेतकरी संमेलनात काँग्रेसने केलेल्या सर्व आरोपांवर भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून जनादेश मिळालेले कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात आले होते.