शहीद संदीप उन्नीकृष्णनवर येतोय चित्रपट ‘मेजर’

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी जीवाची बाजी लावणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता आदिवी सेश यांत संदीप यांची भूमिका करणार असून चित्रपटाचे निर्माते आहेत महेश बाबू. आज म्हणजे १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसाठी रिलीज केला जात असून त्यात संदीप यांच्या रूपातील आदिवी सेश यांची झलक दिसणार आहे.

पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये २६ नोव्हेबर रोजी भीषण हल्ला करुन अनेक निरापराध नागरिकांचे जीव घेतले होते. तीन दिवस त्यांनी मुंबई वेठीला धरली होती आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कमांडो दलाची मदत घ्यावी लागली होती. त्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा समावेश होता आणि ताज हॉटेल मध्ये दहशद्वाद्यांशी लढा देताना गोळी लागल्याने ते शहीद झाले होते.

त्यांची भूमिका साकारणारे सेश म्हणतात, मुंबई हल्ल्यात प्रत्यक्ष त्या दिवशी काय घटना घडल्या याची पूर्ण माहिती अजून लोकांपुढे आलेली नाही. एका बहादूर मेजरची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. पहिल्या क्षणापासून संदीप यांच्या प्रतिमेचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यांच्या डोळ्यात एक आत्मविश्वास आणि ओठांवर हलके हसू असलेला फोटो पाहिला तेव्हा हे माझ्याच कुटुंबातील आहेत अशी भावना मनात दाटून आली.