लडाखमध्ये एप्रिल २०२१ पर्यंत नवी ३६ हेलीपॅड

जम्मू काश्मीरपासून अलग करून केंद्रशासित प्रदेश असा दर्जा मिळालेल्या लडाख भागात एप्रिल २०२१ पर्यंत नवी ३६ हेलीपॅड उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे ऐन हिवाळ्यात सुद्धा लेह, कारगील या दुर्गम भागाशी संपर्क ठेवणे शक्य होणार आहे. स्थानिक नागरिक आणि सामरिक गरजा लक्षात घेता ही हेलीपॅड फार महत्वाची भूमिका बजावतील असे स्पष्ट केले गेले आहे. या प्रदेशाचे लेफ्ट.गव्हर्नर आर.के माथुर यांनी हेलीपॅड निर्मितीचे काम कसे चालले आहे याचा आढावा घेणारी एक बैठक नुकतीच घेतली.

या भागात लोकसंख्या कमी आहे आणि भूभाग विस्तीर्ण आहे. यातील बराचसा भाग दुर्गम आहे. हिवाळ्यात हा भाग अनेकदा बाकी भागापासून तुटला जातो. हिमपातामुळे दळणवळण बंद होते. चीन सीमा येथून जवळ आहे आणि सीमाभागात चीनी सैनिक रोज नवीन कुरापती काढत आहेत. त्यामुळे या भागात दळणवळण सुधारणे महत्वाचे काम आहेच पण त्यामुळे या भागाचा विकास वेगाने होऊ शकणार आहे. तसेच हेलीपॅड बांधली गेली की पर्यटक हिवाळ्यात सुद्धा या भागाला भेट देऊ शकतील आणि त्यामुळे या भागाचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागणार आहे.