जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने यामुळे कव्हर पेजवर मारला ‘रेड क्रॉस’


नवी दिल्ली – वर्ष 2020 च्या अखेरच्या महिन्यासाठी अर्थात डिसेंबर 2020 चे कव्हर पेज जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने जारी केले आहे. पण, मॅगझीनच्या कव्हर पेजवर यावेळी 2020 वर ‘रेड क्रॉस’ म्हणजेच फुल्ली (X) मारण्यात आली आहे. टाइम मॅगझीनच्या इतिहासात असे पाचव्यांदा झाले आहे. या प्रसिद्ध मॅगझीनने यापूर्वी चार वेळेस आपल्या कव्हर पेजवर ‘रेड क्रॉस’ मारला होता.

पहिल्यांदा 1945 मध्ये टाईम मॅगझीनने जर्मनीचा हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा मृत्यू दर्शवण्यासाठी रेड क्रॉसचा वापर केला होता. दुसऱ्यांदा 2003 मध्ये इराक युद्धाच्या सुरूवातीला टाइम मॅगझीनने कव्हर पेजवर रेड क्रॉस मारला होता. त्यानंतर वर्ष 2006 मध्ये अमेरिकी सैन्याने इराकमध्ये अल-कायदा नेता अबू मौसब अल-जरकावीचा खात्मा केल्यानंतर मॅगझीनने तिसऱ्यांदा रेड क्रॉसचा वापर केला.

त्यानंतर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर 2011 मध्ये टाइम मॅगझीनने चौथ्यांदा रेड क्रॉसचा वापर केला होता आणि आता पाचव्यांदा 2020 च्या अखेरीस पुन्हा रेड क्रॉस मॅगझीनने वापरला आहे. यावेळी रेड क्रॉस कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे. याशिवाय, कव्हर पेजवर ‘The Worst Year Ever’ म्हणजे आतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष असे देखील नमूद केले आहे.