मेट्रो कारशेड : राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? – देवेंद्र फडणवीस


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आज कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. एमएमआरडीएला मुंबई उच्च न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिले असून आहे त्या स्थितीत भूखंड ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारने कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज त्यावर सुनावणी झाली. याप्रकऱणी अंतिम सुनावणी फेब्रुवारीत सुरु होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर राज्य सरकारवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.

कोणत्याही प्रकारची हार जीत विकासकामांमध्ये करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केले पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच असून कारशेडचे काम तात्काळ सुरू न केल्यास २०२४ पर्यंत प्रकल्प लांबेल. त्याचबरोबर राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?, असा सवालही फडणवीस यांनी केला.

मेट्रोपासून मुंबईकरांना वंचित ठेवण्याचे काम केले जात असून या कामात सरकार जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचे नुकसान होते. हे काम गेले वर्षभर रखडलेले असल्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झाले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारशेडचे काम आरेमध्ये तात्काळ सुरू करण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे हे नवीन आहेत आणि ते पहिल्यांदाच मंत्रिपदावर आहेत. जनतेसाठी त्यांनी काम करावे. त्याचबरोबर अहवाल वाचून त्यांनी काम करावे. त्यांनी यापूर्वी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल वाचावा, असेही फडणवीस म्हणाले.