बालहट्टापायी मेट्रो-३ प्रकल्पासाठी ठाकरे सरकारला मोजावे लागणार अधिक पाच हजार कोटी


मुंबई – मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या आदेशाबाबत सोमवारी उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची जिल्हाधिकारी नव्याने सुनावणी घेणार का? की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा सरकारला न्यायालयाने केली. आता न्यायालयाच्या या भूमिकेनंतर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे.


या मुद्यावरून ठाकरे सरकारला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी टोला लगावला आहे. मेट्रो कांजूर कार शेड, उच्च न्यायालयाने सरकारला पूनः सुनावणी करायला सांगितले. मेट्रो ५ वर्ष रखडणार, ५००० कोटी अधिक मोजावे लागणार, असल्याचे ट्विटद्वारे सोमय्या यांनी म्हटले आहे.


तर, या मुद्यावरून या अगोदर भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकावर टीका केली. अहंकारी राजाच्या कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारण्याच्या “डीजे” वाजवण्याला उच्च न्यायालयाने चांगलींच तंबी दिली. कोट्यावधीचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? गेले वर्षभर मुंबईकरांच्या मेट्रोचा हा खेळ खंडोबा करुन डीजे डान्स करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची आता माफी मागावी! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.


त्याचबरोबर न्यायालयाने स्पष्ट शब्दात कांजूरमार्गच्या निर्णयाबाबत सरकारला फटकारले आहे. पुन्हा सुनावणी घेऊन निर्णय होईपर्यंत, असे सांगत आरे कारशेड का नको? असा सवाल ही केलाय. शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालेच ना? असा टोला देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.