मुंबई – राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार नवीन वर्षात कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत असून मागील नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरु होण्याची शक्यता आहे. यासंबंधी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ही महत्वाची माहिती हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
ठाकरे सरकार मुंबईकरांना देणार नवीन वर्षात मोठे गिफ्ट
मुंबई आणि महाराष्ट्राची परिस्थिती आता बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसंबंधी निर्णय होणार आहे. थोडा वेळ जाईल आणि जानेवारीत लोकल ट्रेन सुरु करण्यात काही अडचण येणार नसल्याचे मला वाटते, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
कोरोनाबाधितांची एकूण घटती रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तसेच कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची भीती गेली आहे. ३१ डिसेंबरनंतर नवीन वर्ष सुरु झाले की ट्रेनला पुन्हा रुळावर आणू आणि सर्वसामान्यांची सेवा सुरु होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांना लोकलमधील गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार यासंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की, सध्या कोरोना नियंत्रणात आहे. दिल्लीत थंडी आणि गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली, तशीच परिस्थिती मुंबईत उद्भवू नये यासाठी पुढचे १५ दिवस नियोजन आणि चर्चा केली जाणार आहे. मास्क न घालता कोणी ट्रेनमध्ये चढू नये, गर्दी कमी करण्यासाठी नियोजन, पोलीस तसेच इतर मनुष्यबळाची मदत या सगळ्या गोष्टींची चाचपणी आणि तयारी पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात पहिल्या तारखेपपासून लोकल सुरु करण्यासंबंधी विचाराधीन आहे.