इथेनॉल होऊ शकते दोन लाख कोटीची अर्थव्यवस्था: नितीन गडकरी


नवी दिल्ली: इथेनॉलची उत्पादन हा भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा व्यवसाय ठरू शकतो. या क्षेत्रामध्ये दोन लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता असून त्यापैकी १०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत, असा दावा केंद्रीय लघु व माध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केला.

भारतात सध्या ऊसाच्या मळीपासून इथेनॉलचे उत्पादन केले जाते. मात्र, केंद्र सरकारने तांदूळ आणि अक्यापासून इथेनॉल उत्पादनालाही परवानगी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. इथेनॉलचा वापर पेट्रोल आणि डिझेल या इंधनांमध्ये मिसळण्यासाठी केला जाईल. त्यामुळे देशाला परकीय चलन देऊन आयात कराव्या लागण्याऱ्या क्रूड तेलामध्ये घट होईल. त्यामुळे परकीय चलनाची बचत होण्याबरोबरच प्रदूषणाची पातळीही घटणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहेत. असे त्यांनी सांगितले.

राज्यांनी आपापल्या क्षेत्रात इंथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारकडून कर्जाच्या स्वरूपात अर्थसहाय्य केले जाईल. या कारखान्यात उत्पादन केले जाणारे इथेनॉल केंद्र सरकार खरेदी करेल. देशात काही ठिकाणी इथेनॉलचे पंप सुरु करण्यात आले आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्याही बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.