केजरीवाल यांच्या निवासस्थानी तोडफोड; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप


नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर तोडफोड करण्यात आली असून हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.

भाजपाशासित नगर निगम सरकारकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम देत नसल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरून बसले आहेत. या कार्यकर्त्यांनी निवासस्थानाची तोडफोड केली आणि निवासस्थाबाहेरचे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, असा आरोप मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. मात्र, भाजपने या आरोपाचा इन्कार केला आहे.

आम्ही ७ दिवस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरून बसलो आहोत. त्याची दखलही मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. काही महिला कार्यकर्त्या विश्रांती घेत असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. महिला कार्यकर्त्यांच्या खाजगीपणाचे रक्षण करण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी ते काढून टाकले, असा खुलासा उत्तर दिल्ली नगर निगमचे महापौर जय प्रकाश यांनी केला.

यापूर्वीही उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मात्र, पोलीस याबाबत मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.