शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे तुकडे गॅंग’: रविशंकर प्रसाद


पाटणा: ‘तुकडे- तुकडे गॅंग’ शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे.

नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आंदोलनकर्ते कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार न घेण्याचे इशारे देत आहेत. आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो की, आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर मोदी सरकारच्या वतीने अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

देशाचे तुकडे करू पाहणाऱ्यांनी दिल्ली आणि आहाराष्ट्रातील दंगली घडविण्यात सहभागी असलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. वास्तविक त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना न्यायालय जामीन देत नाही. आता हे समाजकंटक शेतकरी आंदोलनाच्या आडून आपल्या मागण्या रेटत आहेत, असा आरोप प्रसाद यांनी केला.

यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी आंदोलन समाजविघातक डाव्या पक्षांनी आणि माओवाद्यांनी ‘हायजॅक’ केल्याचा आरोप केला आहे. समाजस्वास्थ्य विघडविणाऱ्या कट कारस्थानांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.