आता 365 दिवस आणि 24 तासात कधी करु शकता आरटीजीएस


नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आजपासून वर्षाच्या 365 दिवसांसाठी आणि 24 तास ‘रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट’ (आरटीजीएस) प्रणाली लागू केली असून यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आरटीजीएस सुविधा आजपासून 24*7 कार्यान्वित करण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीस रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2020 पासून सातही दिवस 24 तास रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम सुरु ठेवण्याची घोषणा केली होती. म्हणजेच, आतापासून तुम्हाला बँक उघडण्याची किंवा बंद होण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्याचबरोबर आता तुम्ही कधीही मोठे व्यवहार करु शकता.

किमान मर्यादा दोन लाखांची
देशभरात डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. कोरोना काळात डिजिटल बँकिंगचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर आरटीजीएस अंतर्गत किमान हस्तांतरणाची रक्कम दोन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त रकमेला कोणतीही मर्यादा नाही.

आरटीजीएस म्हणजे काय?
आरटीजीएस म्हणजे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम. ‘रिअल टाइम’ म्हणजे झटपट. म्हणजेच आपण पैसे हस्तांतरित करताच ते खात्यात तात्काळ जमा होतात. जेव्हा आपण आरटीजीएसद्वारे व्यवहार करता तेव्हा तात्काळ दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात.

विनामूल्य आहे आरटीजीएस सुविधा
रिझर्व्ह बँकेने 6 जून 2019 रोजी रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) माध्यमातून सर्वसामान्यांना मोठी भेट देऊन हा व्यवहार विनामूल्य केला.