‘हवामान बदलाच्या संकटाशी भारत आणि युरोप एकत्र लढणार’


नवी दिल्ली: हवामान बदलाबाबत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरिस कराराच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये भारत आणि युरोपीय देशांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ब्रिटनमधील ‘थिंक टँक’ युरोप एशिया फाऊंडेशनच्या वतीने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारचा पहिला भाग ‘इंडिया टॉक्स’ असा घेण्यात आला. या वेबिनारमध्ये भारतीय खासदार, हवामानतज्ज्ञ, राजनीतीज्ञ यांनी सहभाग घेतला.

हवामान बदलाला तोंड देण्यासाठी एकमेकांकडे बोटे न दाखवता उपाययोजनांना आपल्या घरापासूनच सुरुवात करणे आवश्यक असल्याचे मत युरोपीय महासंघातील भारताचे माजी राजदूत मनजीव पुरी यांनी व्यक्त केले. कोरोना महासाथीचे असूनही भारत आणि युरोपने हवामानबदलावर काम करणे सुरूच ठेवले आहे. भारत आणि युरोपने या प्रश्नाला प्राधान्यक्रमात स्थान दिले आहे, असेही ते म्हणाले. ‘क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स’मध्ये अर्ध्या दशकापूर्वी ३१ व्य स्थानावर असलेल्या भारताने उल्लेखनीय कामगिरी करीत सर्वोत्तम १० देशांमध्ये स्थान प्राप्त केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सौर ऊर्जा कागदावरच किफायतशीर
सौर ऊर्जा किफायतशीर असल्याचा दावा केला जात असला तरी ती केवळ कागदावरच स्वस्त आहे. जोपर्यंत सौर ऊर्जा बॅटरीच्या माध्यमातून साठविण्याचे कार्यक्षम आणि किफायतशीर मार्ग सापडत नाहीत तोपर्यंत तिच्या वापराबाबत फार पुढे जाणे अवघड आहे, असे खासदार एम जे अकबर यांनी निदर्शनास आणून दिले. कोळशाचा बेसुमार वापर करणाऱ्या देशांनी आम्हाला काही शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, असेही त्यांनी सुनावले. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या देशांकडून विकसनशील देशांना १० हजार कोटी डॉलर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यापैकी किती रक्कम या देशांना मिळाली; असा सवालही त्यांनी केला.