पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना मिळाला ‘नकोसा नजराणा’: योगेंद्र यादव


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या कृषी कायद्यांच्या रूपाने नजराणा दिला गेला आहे. शेतकऱ्यांना तो नको आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यास तयार नाही, अशी टीका ‘स्वराज इंडिया’चे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केली.

यादव यांनी दिल्ली- जयपूर महामार्गावर नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा व्यक्त केला. हा महामार्ग आंदोलकांनी अंशतः बंद केला आहे. यादव यांनी आपल्या भेटीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर ताशेरे ओढले.

आपण शेतकऱ्यांना दिलेला नजराणा ऐतिहासिक असल्याचा दावा मोदी करीत असले तरी हा नजराणा शेतकऱ्यांना नकोच आहे. शेतकऱ्यांना काय हवे आहे हे समजून घेण्याची सरकारची तयारी नाही. त्यामुळेच आंदोलक आणि सरकार यांच्यात अनेकदा वाटाघाटी होऊनही त्या निष्फळ ठरल्या, असे यादव यांनी नमूद केले. शेतकरी आपल्याला नजराणा नको असल्याचे सांगत आहेत आणि पंतप्रधान आहे तोच नजराणा नव्या आवरणात देण्याची भाषा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पंतप्रधानांनी हे कायदे रद्द करावे. तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत, असे यादव म्हणाले.