रात्रभर फिरूनही वधूचे घर न सापडल्याने परतली वरात

देशात गेले वर्षभर करोना मुक्काम टाकून असल्याने लगीनकाळात सुद्धा अनेकांचे विवाह होऊ शकले नाहीत तर अनेकांना अगदी थोड्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची पाळी आली. पण उत्तर प्रदेशातील आझमगड मधील मउ गावात एक वेगळाच प्रकार घडला. येथे विवाहासाठी नवऱ्याची वरात आली, रात्रभर गावातून मिरवली पण वधूचे घरच न सापडल्याने नवरी न घेताच वरात त्यांच्या गावी गेली. अर्थात या प्रकराने चिडलेल्या वऱ्हाडाने ज्या महिलेच्या मध्यस्थीने विवाह ठरविला गेला होता त्या महिलेल्या बंदी बनवून रात्रभर बांधून ठेवले आणि अखेर पोलीस ठाण्यात सर्व प्रकरण मिटविले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार एक महिलेच्या मध्यस्थीने हा विवाह ठरविला गेला होता. तो १० डिसेंबर रोजी होणार होता. वधू आणि वर असे दोन्ही घरातले लोक एकमेकांना भेटले, लग्नाची बोलणी झाली, तारीख ठरली आणि नवरदेवाच्या बाजूने नवरीकडच्या लोकांना २० हजार रुपये लायटिंग आणि बँडबाजासाठी दिलेही गेले. या प्रकारात एकच चूक झाली म्हणजे नवरदेवाकडील मंडळीनी वधूचे घर पाहिले नव्हते. ठरल्या तारखेला वरात वधूच्या गावी पोहोचली, गावभर फिरली पण वधूचे घर सापडलेच नाही.

शेवटी संतापलेल्या वर पक्षाने मध्यस्ती महिलेला पकडून बांधून ठेवले. तिने वधू कडच्या लोकांनी तिलाही फसविल्याचे सांगितले आणि अखेर पोलीस स्टेशन मध्ये हे प्रकरण गेले तेव्हा या मध्यस्त महिलेला वधू पक्षाने खरोखरच फसविल्याचे उघडकीस आले. पोलीस वधू पक्षाच्या शोधात असल्याचे समजते.