भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना करोना

प. बंगाल मध्ये एप्रिल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकात २०० पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी रणनीती आखणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बंगाल दौऱ्यावरून नुकतेच परतले असून त्यांना करोना संसर्ग झाल्याचे नड्डा यांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे. नड्डा लिहितात, प. बंगाल मध्ये निवडणूक सभा घेत असतानाचा करोना संसर्ग लक्षणे जाणवू लागल्याने करोना चाचणी करून घेतली, त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. होम आयसोलेशन मध्ये गेलेल्या नड्डा यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

नड्डा यांची तब्येत चांगली असून आयसोलेशनचे सर्व नियम पाळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना लवकर बरे व्हा अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. बंगाल दौऱ्यात नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर तुफानी दगडफेक केल्यावरून ममता सरकार आणि तृणमुल यांच्यावर टीकेची झोड उडविली गेली होती. करोना चाचणी पोझिटिव्ह आल्याचे नड्डा यांचा २ ते ५ जानेवारी दरम्यात नियोजित असलेला झारखंड दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.