‘आयएनएस विराट’वर संग्रहालयाची शक्यता धूसर; अटींची पूर्तता अशक्य


नवी दिल्ली: भारतीय नौसेनेची ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस विराट’चा ताबा असलेल्या कंपनीने घातलेल्या कठीण अटींमुळे ‘विराट’वर संग्रहालय उभारण्याची शक्यता धूसर बनली आहे. गुजरात येथील एक कंपनी एन्व्हिटेक मरीन कन्सल्टंट्स आणि गुजरात सरकार यांनी संयुक्तपणे या संग्रहालय उभारणीचा प्रस्ताव दिला आहे.

‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनकडून श्रीराम शिप ब्रेकर या कंपनीने ३८ कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र, आता कंपनीने ‘एन्व्हीटेक’कडे ११० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्याची अटही घालण्यात अली आहे. युद्धनौकेच्या खरेदीसाठी ही किंमत एकरकमी देण्याचीही श्रीराम शिप ब्रेकरची मागणी आहे. ‘इन्व्हिटेक’ने काही हप्त्यांमध्ये रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, श्रीराम शिप ब्रेकरने हा प्रस्ताव नाकारला आहे.

‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौकेने भारतीय नौदलात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. ब्रिटिश बनावटीच्या या युद्धनौकेने प्रथम ब्रिटिश रॉयल नेव्ही आणि नंतर भारतीय नौदलात सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी या युद्धनौकेचा ताबा आंध्रप्रदेश राज्य सरकारकडे देण्यात येणार होता. मात्र तो प्रस्ताव प्रत्यक्षात आला नाही. त्यानंतर एका ब्रिटीश व्यावसायिकाने ‘क्लाऊड फंडींग’च्या माध्यमातून संग्रहालय उभारणीचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.