नागपूर: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे झाल्यास आम्हालाच फायद्याचे असल्यामुळे आम्हाला चांगली संधी मिळते. सध्या काँग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. त्याचबरोबर जर पवार एनडीएमध्ये आले तर मोदींचे हात आणखी बळकट होतील, अशी मुक्ताफळेही आठवले यांनी उधळली.
रामदास आठवले नागपुरात कोरोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी व एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षाने पवार यांना अपमानास्पद वागणूक दिली. पंतप्रधान होण्याची त्यांना संधी असतानाही डावलले. त्यांच्याशी संसदीय बोर्डाच्या बैठकीतही योग्यपध्दतीने वागत नव्हते. त्यांच्याकडे दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनीही दुर्लक्षच केले. काँग्रेसमध्ये असताना पवार यांच्यावर अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसजवळ असल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना केल्यास काय हरकत आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.
शरद पवारांनाच काँग्रेसचे अध्यक्ष करा; रामदास आठवले
केंद्र सरकारचे मंत्री दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वेगवेगळे आरोप करीत आहेत. कुणी म्हणतात खलिस्तानी घुसले आहेत. कुणाला त्यात माओवादी घुसल्याची शंका आहे. तर, कुणाला यात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा दावा आहे. आठवले यांनी यावर असे काहीही नसल्याचे स्पष्ट करीत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला. पण सरकारने याप्रकरणी या शंका दूर करण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणीही केली. पंजाब व हरियाणा या दोन राज्यापुरतेच हे शेतकरी आंदोलन मर्यादित असल्याचा दावा करीत, शेतकऱ्यांनी आंदोलनाचे दिवस काढू नयेत, असे आपणास वाटत असल्याची भूमिकाही जाहीर केली. केंद्र सरकार कृषि विधेयके मागे घेणार नाहीत. त्याऐवजी दोन पाऊले शेतकऱ्यांनी व दोन पावले केंद्राने मागे घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.
अंबानी व अदानी आधीच श्रीमंत आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. हे कृषि कायदे त्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आले असतील, हा आरोपही आठवले यांनी फेटाळून लावला. यावेळी आझाद विदर्भ सेना ही संघटना रिपाईत विलीन झाल्याची घोषणा आठवले यांनी केली. तसेच, भुदान चळवळीवेळी दान दिलेल्या ४७ लाख एकर जागेची माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारला पत्र लिहीणार असल्याचे सांगितले.
आगामी निवडणूकीत मुंबई महानगर पालिकेतून शिवसेना हद्दपार होईल. भाजपसोबत रिपाईची युती असेल. गेल्यावेळी भाजपने ८२ जागा जिंकल्या. सेनेला९४ मिळाल्या. आता रिपाई सोबत असल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल. भाजपचा महापौर तर, रिपाईचा उपमहापौर होईल.
काँग्रेससोबत यापुर्वी युती असताना रिपाईला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी रिपाईचे चंद्रकांत हंडोरे महापौर झाले होते, त्याची आठवण त्यांनी करून दिली. महानगरपालिका निवडणुकीत कितीही एकत्रित लढण्याचे दावे करण्यात आले तरी, काँग्रेस शेवट वेगळी लढेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. शिवाय, नुकत्याच संपलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा झाला. पुढच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष पराभूत होतील, असे भाकीतही त्यांनी केले.
रिपाई ऐक्य अॅड. प्रकाश आंबेडकरांशिवाय होत नसल्यामुळे आमचा रिपाई पक्ष बळकट करण्याचर आम्ही भर दिला आहे. आमचा निळा झेंडा व नाव कायम आहे. अॅड. आंबेडकरांनी झेंडा व नावही बदलले. त्यांची ऐक्याची मानसिक तयारी नसल्यामुळे आता रिपाई ऐक्य होणे नाही. परंतु, आंबेडकर यांनी एनडीएत आल्यास त्यांनाही चांगली संधी असेल. समाजालाही फायदा होईल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.