शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्या: भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेसमनचे मत


वॊशिंग्टन: शेतकरी आणि शेतमजूर हा देशाचा कणा आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत त्यांची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीचे भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी रो खन्ना यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून सन्मान्य तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे. दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण मार्गाने विरोध, मतभेद व्यक्त करता येतो. भारतात नव्या कृषी कायद्यांच्या वादावरही अशाच प्रकारे चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा आहे, असे खन्ना यांनी नमूद केले.सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरू असलेल्या चर्चेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

भारतातील; विशेषतः पंजाबमधील शेतकऱ्यांचे अनेक कुटुंबिय व नातेवाईक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भारतातील शेतकरी आंदोलनाचे पडसाद अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. जिम कोस्टा आणि शीला जॅक्सन ली या काँग्रेस सदस्यांनीही या आंदोलनाबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे.