सिहोर: शेतकरी आंदोलनादरम्यान डावे देशद्रोही शेतकऱ्यांच्या वेशात सहभागी होऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. नव्या कृषी कायद्यांमध्ये कोणत्याही सुधारणांची आवश्यकता नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
‘शेतकऱ्यांच्या वेशात डाव्या देशद्रोह्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल’
वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहेमी चर्चेत असणाऱ्या ठाकूर यांनी जाहीर सभेत बोलताना शेतकरी आंदोलनासह शाहिनबाग आंदोलनातही डाव्यांनी सहभाग घेऊन देशात अशांतता निर्माण करीत आहेत, असा आरोप केला.
शाहिनबागच्या आंदोलनात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या लोकांबरोबरच डाव्या पक्षातील काही लोक सहभागी होऊन लोकांना भडकविण्याचे काम करीत होते. शेतकरी आंदोलनातही हेच चेहरे दिसून येत आहेत. अशा देशद्रोह्यांना शोधून काढून त्यांना गजाआड करणे आवश्यक आहे, असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांमध्ये कोणतीही सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. सर्व सुधारणा करूनच हे कायदे लागू करण्यात आले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
राषट्रभक्तांना कुटुंबनियोजनाची सक्ती नको
जे लोक देशविरोधी कारवाया करतात, ज्यांना दहशतवादी आणि देशविरोधी कारवायांचे प्रशिक्षण सर्रास दिले जाते त्यांना कुटुंबनियोजनाचा कायदा लागू करावा. देशभक्त आणि देशहिताची कामे करणाऱ्यांवर अपत्यांच्या संख्येचे कोणतेही बंधन असू नये, अशी आश्चर्यकारक मागणीही त्यांनी केली आहे.