शेतकरी आणि सरकारमध्ये दोन दिवसात होणार सहमती: दुष्यन्त चौटाला


नवी दिल्ली: एकीकडे आंदोलक शेतकऱ्यांकडून आंदोलन अधिक तीव्र करण्याचे इशारे दिले जात असतानाच हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यन्त चौटाला यांनी येत्या २४ ते ४८ तासात नव्या कृषी कायद्यांच्या वादाबाबत सहमतीने तोडगा निघेल, असा दावा केला आहे.

चौटाला यांच्या जननायक जनता पक्षासाठी शेतकरी मतदार हा अत्यंत महत्वाचा आहे. हरयाणामध्ये त्यांच्या पक्षाची भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे. ही युती राज्यात सत्तेवर आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चौटाला यांनी नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली.

शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या पुढच्या फेऱ्या फलदायी ठरतील. पुढच्या २४ ते ४८ तासात चर्चेची अंतिम फेरी होईल आणि त्यात दोन्ही पक्षांची अंतिम उपायांबाबत सहमती होईल अशी अशा आपल्याला वाटत असल्याचे चौटाला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे त्याच दृष्टीने आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यात नव्या कृषी कायद्यांबाबत सहमतीने मार्ग निघेल आणि दिल्लीच्या सीमांवर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती निवळेल, अशी आशा चौटाला यांनी व्यक्त केली. केंद्राचा त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद असल्याचेही त्यांनी सांगितले.