वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना


वॉशिग्टन – देशात मोदी सरकारच्या कृषि विधेयकावरुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद भारताबाहेर उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. कृषि विधेयकांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्याने महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला.

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले आंदोलन अजूनच तीव्र केले आहे. देशाबाहेरूनही दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. पण वॉशिग्टनमध्ये कृषि कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. खलिस्तानी झेंडा खलिस्तानी घटकांनी पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला.

या घटनेची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली असून दूतावासाकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. आम्ही शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा निषेध व्यक्त करत असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने याचा निषेध अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.