बालाकोटचा दहशतवादी तळ पुन्हा सुरू: घुमल्या भारतविरोधी घोषणा


नवी दिल्ली: भारतीय लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून उध्वस्थ केलेला बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास ‘जैश ए मोहोम्मद’ या दहशतवादी संघटनेने सुरुवात केली असून या तळावर भारतविरोधी घोषणा घुमू लागल्या आहेत.

भारतीय लष्कराने मागील वर्षी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ लक्षवेधी हल्ला करून नष्ट केला होता. मात्र, हा तळ पुन्हा सुरु करण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम त्या ठिकाणी सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी भारतीय वायुदलाने हवाई हल्ला करून दहशतवादी तळ उध्वस्थ केला त्याच ठिकाणी तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

याच तळावर ‘जैश ए ओहोम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ अजहर याच्या उपस्थितीत नवीन भरती केलेल्या दहशतवाद्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओमध्ये उपस्थित जमाव भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहे.