विरोधकांना डावलले; आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका: पवार

मुंबई: नवे कृषी कायदे करताना विरोधकांना विश्वासात घेण्याऐवजी त्यांना डावलण्यात आले. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत तरी पाहू नका; असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास हे आंदोलन दिल्लीच्या सीमांपासून देशाच्या अन्य भागातही वणव्याप्रमाणे भडकू शकेल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

सलग तिसऱ्या आठवड्यात दिल्लीच्या सीमा अडविणारे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यावर काही तोडगा निघण्याच्या शक्यता धूसर होत चालल्या असून ते अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सरकारला हा सल्ला आणि इशाराही दिला आहे.

संसदेत बहुमताच्या जोरावर कोणत्याही चर्चेविना तुम्ही या कायद्यांची विधेयके मंजूर करून घेऊ शकालही. मात्र, त्यानंतर त्यावर शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटणे टाळता येणार नाही, याची कल्पना ही विधेयके पटलावर मांडण्यापूर्वी सरकारला देण्यात आली होती. मात्र, सरकारने यांच्याकडे डोळेझाक केली आणि ही विधेयके केवळ १५- २० मिनिटात मंजूर करून घेतली, असा आरोपही पवार यांनी केला.

सरकारच्या अट्टाहासामुळेच आता शेतकऱ्यांनीही टोकाची भूमिका घेतली असून यातून मार्ग काढण्यासाठी हे कायदे रद्द काढण्याशिवाय अन्य मार्ग शिल्लक नाही. मात्र, सरकार हा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी काळ सुरूच राहण्याची शक्यता आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांच्या संयमाचा अंत पाहणे योग्य ठरणार नाही, असेही पवार म्हणाले.

कुठे आणि काय बोलावे याचा पोच नाही

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याच्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानाबद्दल विचारले असता; ‘काही लोकांना कुठे आणि काय बोलावे याचा पोच असत नाही. असल्या विधानांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही;’ अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.