शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास काय असेल शिवसेनेची भूमिका


मुंबई – सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचे अध्यक्षपद दिल्याची चर्चा रंगली आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार यांचे नाव पुढे असल्याची चर्चा आहे. शरद पवार लवकरच युपीएचे अध्यक्षपद स्वीकारतील, असा दावाही केला जात असतानाच या दरम्यान युपीएचे शरद पवार अध्यक्ष झाल्यास शिवसेनेची काय भूमिका असेल यावर पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर युपीएचे शरद पवार अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी ती आनंदाची बाब आहे. पण अशी कोणतीही शक्यता मला दिसत नाही. हे वृत्त शरद पवारांनीही नाकारले आहे. शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. पण युपीए अध्यक्षपदाबाबत जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जर शरद पवारांनी ही गोष्ट स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचे समर्थन करु, असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधकांना एकत्र येऊन नव्या राजकीय वातावरणात काही निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण लोकसभेत विरोधी पक्षाचे पद ते मिळवू शकले नाहीत, हे सत्य आहे. आपल्याला अशा परिस्थितीत एकत्र येऊन युपीएला मजबूत करावे लागेल. महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचे नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय़ होतील, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान दुसरीकडे या सर्व बातम्या निराधार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने वृत्त फेटाळून लावले आहे. प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचे वृत्त दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटले आहे. अशा प्रस्तावासंबंधी युपीएमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित असल्याचे महेश तपासे यांनी म्हटले आहे. देशात सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरल्याचे दिसत असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.