इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप फेसबुकला विकावे लागणार ?


नवी दिल्ली – सोशल मीडिया जगतात आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली असून फेसबुकविरोधात अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये एकवटल्याचे चित्र आहे. फेसबुकविरोधात अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि ‘युएस फेडरल ट्रेड कमिशन’ने खटला दाखल केला आहे. एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना ‘चिरडण्यासाठी’ बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे. पॅरेंट कंपनीपासून फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस वेगळा ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.

हा खटला बुधवारी फेसबुकविरोधात दाखल झाल्याचे वृत्त समोर येताच फेसबुकच्या शेअर्सवर परिणाम झाला. अमेरिकेमध्ये यावर्षात एखाद्या मोठ्या टेक कंपनीविरोधात दाखल झालेला हा दुसरा मोठा खटला ठरला आहे. गुगलविरोधातही यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकांआधी खटला दाखल करण्यात आला होता. गुगलवर त्यावेळी ऑनलाइन सर्च आणि जाहिरातींच्या मार्केटवर ताबा मिळवण्याचा आरोप करण्यात आला होता.

फेडरल ट्रेड कमिशन आणि न्यू-यॉर्क अ‍ॅटॉर्नी जनरल लेटिटिया जेम्स यांनी फेसबुकविरोधात दाखल केलेल्या खटल्याबाबत माहिती दिली. फेसबुक जवळपास एका दशकापासून आपल्या ताकदीचा वापर करुन छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे जेम्स म्हणाले. फेसबुक छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचे आपल्या वर्चस्वासाठी धोका ठरण्याआधीच अधिग्रहण करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

आपला एकाधिकार टिकवण्यासाठी फेसबुकने एक रणनीति तयार केली आहे. फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामचे 2012 मध्ये अधिग्रहण, तर मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे 2014 मध्ये अधिग्रहण हा त्यांच्या रणनितीचाच भाग असल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तोटा झाला आणि सोशल नेटवर्किंगसाठी नेटकऱ्यांसमोर मर्यादित पर्याय राहिल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, खटल्याचा विरोध करताना हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असल्याचे फेसबुकच्या जनरल काउंन्सल जेनिफर न्यूस्टेड यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे आरोपही फेटाळले. अधिग्रहण केल्यापासून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपला तोटा होण्याऐवजी जास्त फायदा झाला, शिवाय दोन्ही प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सनाही फायदा झाल्याचे, जेनिफर न्यूस्टेड यांनी म्हटले आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल जर फेसबुकविरोधात गेला तर फेसबुकला इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स विकावे लागण्याची शक्यता आहे.