कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दोन महिने करता येणार नाही मद्यप्राशन


जगभरातील जवळपास सर्वच देशांना कोरोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यातच जगभरातील १०० हून अधिक प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये कोरोनावर लस शोधण्यासंदर्भात संशोधन सुरु आहे. लवकरात लवकर कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

पण आता लवकरच कोरोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. ब्रिटन, रशिया आणि चीनसारख्या देशांनी आपआपल्या देशातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासंदर्भातील मोहिम सुरु केली आहे. पण ही लस घेतल्यानंतर पूर्वीप्रमाणे आयुष्य लगेच होईल अशी अपेक्षा असेल, तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस देण्याआधीच या लसीसंदर्भात नागरिकांना इशारा दिला आहे. यासंदर्भात टास (टीएएसएस) या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्पुटनिक व्ही लस घेतल्यानंतर नागरिकांना किमान दोन महिने मद्यप्राशन करता येणार नसल्याचे रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोरोना लसीसंदर्भातील सूचना आणि नियमांची घोषणा रशियाच्या उप-पंतप्रधान टाटियाना गोलिकोवा यांनी केली आहे. कोरोनाची लस दिल्यानंतर तिचा परिणाम शरीरामध्ये दिसून येईपर्यंत नागरिकांना काही गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य असणार आहे. कोरोनाची लस दिल्यानंतर ती शरीरामध्ये सक्रीय होऊन परिणाम दाखवण्यास किमान ४२ दिवसांचा अवधी लागू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

रशियन नागरिकांनी लसीकरणानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, किमान लोकांना भेटणे. मद्य सेवन न करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे घेणे हे सर्व करावे लागणार असल्याचे गोलिकोवा म्हणाल्या आहेत. जगात सर्वाधिक मद्यप्राशन करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणाऱ्या रशियाला दोन महिने मद्यप्राशन न करणे कितपत जमणार, यासंदर्भात आताच शंका उपस्थित केल्या जात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रशियन सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गामालय सेंटरने विकसित केलेली स्पुटनिक व्ही या लसीला मान्यता दिली होती.

मान्यता मिळाल्यापासून स्पुटनिक व्ही ही लस आतापर्यंत एक लाखांहून अधिक हाय रिस्क म्हणजेच अधिक धोका असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना देण्यात आल्याचे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी मागील आठवड्यामध्ये संयुक्त राष्ट्रांसमोर दिलेल्या सादरीकरणात सांगितले होते. रशियामध्ये डॉक्टर तसेच शिक्षकांना आधी लस देण्यासंदर्भात योजना आखली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे वर्ष संपेपर्यंत २० लाख रशियन नागरिकांना लस देण्याचे लक्ष असल्याचेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक व्ही लस ९२ टक्के परिणामकारक ठरल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या चाचणीच्या अंतरिम निष्कर्षांत म्हटले होते. कुठलेही अनपेक्षित असे विपरीत परिणाम लसीच्या चाचणीदरम्यान दिसून आले नाहीत. लसीची चाचणी ज्यांच्यावर करण्यात आली, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.