पुणे : आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे दुखःद निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. सकाळी 9.30 वाजता डॉन स्टुडिओ, कर्वे नगर पुणे येथे अंत्यदर्शन तर वैकुंठ येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.
संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन
अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर हेमंत गोडबोले यांच्याकडे पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण घेतले.
अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून त्यांनी संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.