भारताच्या या बेटावर करोनाला टाकता आले नाही पाउल

फोटो साभार बिझिनेस स्टँँडर्ड

भारतातील करोना बाधितांच्या संखेने ९६ लाखाचा आकडा पार केला असताना आणि या साथीने लाखो लोकांचे जीव घेतले असताना भारताच्या एका नितांतसुंदर बेटावर मात्र घातक करोना विषाणूचे पाउल पडू शकलेले नाही. भारताचा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप येथे ८ डिसेंबर पर्यंत एकही करोना केस आलेली नाही. येथील जनजीवन सुरळीत सुरु असून लग्न आणि अन्य समारंभ नागरिक एकत्र जमून आनंदाने साजरे करत आहेत. मास्क, सॅनीटायझर, आणि सोशल डीस्टन्सिंग असे कोणतेही प्रतिबंध येथे नाहीत. या भागाचे खासदार पी पी मोहम्मद फेजल यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीपासूनच नियमांचे कडक पालन केल्याने ही बेटे करोना मुक्त राहिली आहेत.

या बेटांवर पर्यटक मोठ्या संखेने येतात. पण जानेवारीपासून येथे सहज प्रवेश दिला गेलेला नाही. सर्वसामान्य माणूस असो, पर्यटक असो, राजकारणी असो अथवा सेलेब्रिटी असो या बेटावर येऊ इच्छिणाऱ्या सर्वाना कोच्ची येथे सात दिवस विलगीकरणात राहिल्यानंतरच बेटावर प्रवेश दिला जात आहे. कोच्ची येथून जलमार्गे, विमानाने या बेटांवर जाता येते आणि येथे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.

अरबी समुद्रात ३२ किमीच्या परिसरात ही सुंदर ३६ बेटे आहेत. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६४ हजार आहे. या बेटांवर शाळा, ऑफिसेस सुरळीत सुरु आहेत.