ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डीसले याना करोना संसर्ग

फोटो साभार इंडिया टुडे

ग्लोबल टीचर या प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराचे विजेते पाहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डीसले यांना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी रणजितसिंग यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी बार्शी येथील आरोग्य केंद्रात परिवारासह करोना चाचणी केली तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबातील अन्य कुणालाही हा संसर्ग झालेला नाही. रणजितसिंग आणि त्यांच्या पत्नी विलगीकरणात गेले आहेत असे समजते. दरम्यान रणजितसिग यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी करोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले गेले आहे.

रणजितसिंग यांना जागतिक पुरस्कार मिळाल्यावर राज्य शासनाने त्यांचा दोन दिवसांपूर्वी सत्कार केला होता. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या या सत्काराला उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी रणजितसिंग यांना राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार सोबत काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मंगळवारी रणजितसिंग यांचा राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार केला गेला होता. याच दिवशी रणजितसिंग यांनी कृष्णकुंज येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

युनेस्को आणि लंडनच्या वार्की फौंडेशनतर्फे ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी १४० देशातील १२ हजार शिक्षकांकडून नामांकने आली होती. त्यात रणजितसिंग यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. ते सोलापूर मधील परीतेवाडी येथील सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्यांना पुरस्कारापोटी मिळालेल्या ७ कोटी रुपये रकमेतील ५० टक्के रक्कम अंतिम फेरीत आलेल्या ९ शिक्षकांना विभागून देणार असल्याचे जाहीर केले होते.