आता प्राण्यांमध्ये वेगाने फैलावतो आहे करोना

फोटो साभार मुंबई मिरर

जगाची हालचाल बंद पडणाऱ्या कोविड १९ विषाणूने आता प्राणी जगताकडे मोर्चा वळविला असल्याचे दिसून येत आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत असल्याचे सांगितले जात आहे. एका रिपोर्ट नुसार स्पेन मधील बार्सिलोना प्राणीसंग्रहालयातील चार सिंह करोना संक्रमित आढळले आहेत. या चार मधील तीन सिंहिणी १६ वर्षाच्या आहेत तर नर सिंह ४ वर्षाचा आहे. जाल, निमा, रणरण अशी सिंहीणींची नावे आहेत तर सिंहाचे नाव किम्बे असे आहे.

प्राणीसंग्रहालयात देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सिंहांमध्ये करोना लक्षणे दिसल्याने त्यांची चाचणी केली गेली. माणसाप्रमाणेच प्राण्यांची करोना चाचणी केली जाते. यात चारी प्राण्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या महिन्यात या प्राणी संग्रहालयातील दोन कर्मचारी करोना बाधित आढळले होते त्यांच्या मुळेच प्राण्यांना संसर्ग झाला असावा का याची तपासणी केली जात आहे. यामुळे प्राणीसंग्रहालयातील अन्य प्राण्याच्या करोना चाचण्या केल्या जाणार असल्याचे समजते.

यापूर्वी न्युयॉर्क मध्ये असाच प्रकार घडला होता आणि तेथील ब्रोन्क्स प्राणी संग्रहालयात ४ एप्रिल रोजी चार वाघ आणि तीन सिंह करोना बाधित आढळले होते. या प्राण्यांवर काय उपचार केले गेले याची माहिती घेण्यासाठी स्पेन मधील प्राणीसंग्रह व्यवस्थापनाने ब्रोन्क्स शी संपर्क साधला असल्याचे समजते. अर्थात करोना झालेले सर्व प्राणी आजारातून बरे झाले आहेत. अमेरिकेत कुत्री, मांजरे ही करोना बाधित आढळली आहेत.