मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सुनावणी घेण्याची मागणी केली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. पण मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास पाच सदस्यीय घटनापीठाने नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या पदरी निराशा पडली आहे. या याचिकेवर जानेवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. पण छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आजच्या निर्णयावरून काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवल्यानंतर ठाकरे सरकारला संभाजीराजेंचा सवाल
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. सरकारला माझी विनंती आहे, यामुळे मुलांचे फार नुकसान होत असून मुलांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. पुढे काय करायचे हे त्यांना कळत नाही. तोपर्यंत त्यांना इतर माध्यमातून कशी मदत करता येईल. याचा युद्धपातळीवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे. अंतिम निर्णय २५ जानेवारीपर्यंत होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, असे संभाजीराजे म्हणाले.
मी असं म्हणणार नाही की, आपली बाजू रोहितगी आणि इतरांनी चांगली मांडली नाही. मी असे देखील म्हणणार नाही. रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न समजला नाही. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला काही कळाले नाही. पण सरकार तोपर्यंत या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारने सांगावे. महाविद्यालये आज सुरू झाली आहेत. आणखी किती दिवस ही सुनावणी पुढे चालणार याची माहिती नाही. माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. ते कालही माझ्याशी सकारात्मक दृष्टिकोनातून बोलले. मोठेपण दाखवत स्वतःहून फोन करून चर्चा केली. सगळे मान्य आहे, पण पुढे काय करायचे हे सरकारनं सांगावे, असे सांगत संभाजीराजेंनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.