एक दिवस भाजपला ईडीच संपवणार; धनंजय मुंडे


पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुंडे यांनी बोलताना एखाद्या व्यक्तीपर्यंत आपण पोहचू शकत नाही म्हणून त्यांच्या सहकाऱ्यापर्यंत जाणे आणि ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ही ईडीच एक दिवस भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या, असे भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ईडीच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुंडे यांनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले.

धनंजय मुंडे यांनी यावेळी जातीयवाचक नावे हटवण्याच्या निर्णयाबाबतही भाष्य केले. सरकारी रेकॉर्डवर जी जातीयवाचक नावे आहेत, ती पहिले काढली पाहिजेत असा प्रस्ताव आपण समोर आणला. तो प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर जो नियम केला जाईल त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या विकासासाठी शरद पवार यांचे आयुष्य गेले आहे. आम्ही ज्या जबाबदारीमध्ये आहोत आमच्या विभागामार्फत जनतेच्या उपयोगी योजना त्यांच्यासमोर आणणे, सामान्य व्यक्तींचा फायदा होणे ही सर्वात मोठी भेट शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असू शकते, असेही मुंडे म्हणाले.

शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या विरोधातील हे भाजप सरकार असून सुरूवातीला विश्वास देण्यात येतो, परंतु सत्ते आल्यानंतर शेतकऱ्यांना, शेतमजूरांना तेच सरकार पायाखाली तुडवत असल्याचा प्रत्यय आपल्याला येत आहे. जो कायदा केंद्राने केला आहे, तो शेतकऱ्यांना संपवणारा कायदा आहे. शेतकरी संपला तर आपला शेतीप्रधान देशही संपेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

कृषीमूल्य आयोग राज्याचा हमीभाव तयार करून त्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवते. केंद्राकडे हमीभाव ठरवण्याची जबाबदारी आहे. ज्यावेळी ‘कन्विन्स’ करता येत नाही त्यावेळी भाजपकडून ‘कनफ्युज’ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.