आरोग्य विभागातील 8500 रिक्त पदे भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी


मुंबई – आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५०% (८५००) पदे भरण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून ही पदे आगामी कालावधीत भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मोफत रक्त राज्यातील गरजू रुग्णांना मिळावे, यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. रक्तासाठी कुणालाही पैसे मोजावे लागणार नाही याचा निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्यसेवेवरचा विश्वास सामान्य जनतेचा वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका दाखल होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर एका वेबिनारमध्ये चर्चा झाली. यावेळी नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रूपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.