शरद पवारांनीच रोवली कृषी कायद्याची बीजे: फडणवीस


रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात नव्या कृषिकायद्यांची बीजे रोवली गेली. मात्र, आता आपले हितसंबंध जपण्यासाठी ते या कायद्यांना विरोध करीत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये पवार कृषिमंत्री होते. त्या काळात त्यांनी नियुक्त केलेल्या एका कार्य गटाने केलेल्या शिफारशींच्या आधारेच हे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांना पाठींबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत पवार द्विधा मन:स्थितीत होते. मात्र, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी विरोधाचा मार्ग पत्करला, असा दावा फडणवीस यांनी केला.

एका खाजगी वृत्तवाहिनीच्या वेबसाइटवरही पवार यांनी कृषिकायद्यांबाबत ‘ घूम जाव’ केले अशा शीर्षकाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवार यांनी त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठविले. कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला वाव मिळावा यासाठी राज्यांनी कायद्यात सुधारणा करावी, असे त्यात नमूद करण्यात आले होते. कृषी क्षेत्रात विपणन ते साठवणूक, कोल्ड स्टोरेज या सर्वांच्या विकासासाठी खाजगी गुंतवणूक आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले असल्याचा दावा या बातमीत केला आहे.