शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ब्रिटनमधील भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन


लंडन : रविवारी ब्रिटनमध्ये भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथे आंदोलन करण्यात आले. खलिस्तानवाद्यांचे झेंडे यावेळी फडकवण्यात आले. भारतात कृषी विधेयकाविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रविवारी ब्रिटनमधील भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. भारतविरोधी घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात आली, त्याचबरोबर खलिस्तानवादी झेंडेही फडकले. ब्रिटनच्या लंडनस्थित भारतीय उच्चायोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

याबाबत माहिती देताना भारतीय उच्चायोगाने सांगितले की, घडलेला प्रकार हा गंभीर आहे. कारण भारतीय उच्चायोगासमोर कोरोना महामारीदरम्यान ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. सुमारे ७०० वाहने या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. याची माहिती उच्चायोगाला होती की, ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी लंडन पोलिसांनी दिली नव्हती. तसेच ४० वाहनांची परवानगी या आंदोलनासाठी घेण्यात आली होती. एएनआयच्या माहितीनुसार, खलिस्तानी झेंडे या आंदोलनात फडकवण्यात आले, तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनाबरोबरच भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान, या मोठ्या आंदोलनाची ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने दखल घेत आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले. काही समाजकंटकांना यावेळी ताब्यातही घेण्यात आले. उच्चायोगाने सांगितले की, या प्रकरणावर ते बारीक नजर ठेवून आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक विनापरवानगी एकत्रित कसे झाले, यासह इतर पैलुंची चौकशीही केली जात आहे.

उच्चायोगाने आंदोलनक कोण होते आणि त्यांची मागणी काय होती? यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही गोष्ट स्पष्ट आहे की, विभाजनवादी आणि भारतविरोधी हे लोक होते. शेतकरी आंदोलनाआडून जे आपला भारतविरोधी अजेंडा पुढे नेऊ पाहत होते. कृषि विधेयकाविरोधात भारतात सुरु असलेले आंदोलन हा लोकशाहीचा भाग असून भारत सरकार यावर शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्यामुळे हे सांगण्याची गरज नाही की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.